Thursday, January 4, 2024

एकदा विचार करा!!

 स्थिर होणं किती महत्वाचं आहे...???


आपलं आयुष्य खूप अस्थिर गोष्टींनी व्यापलेललं असतं, पण जो पर्यंत तुम्ही स्थिर जीवनाच्या तत्वांचा अंगीकार करणार नाहीत, तो पर्यंत जीवनात शांतता लाभणार नाही.


अनेक गोष्टींच्या आकर्षणाने तुमच्या आयुष्यात खूप सारी ओढाताण होते. अक्षरशः हे आकर्षण तुमचं आयुष्य तुमच्या ताब्यात न ठेवता, त्याच्या ताब्यात तुम्हाला ठेवतं, खूप दूर तुम्हाला वाहवत नेतं.


दिवस-रात्र अश्याच प्रकारच्या आकर्षणांशी झुंज देऊन स्थैर्यत्व प्राप्त करून शांततेच्या स्वाधीन व्हा.


भोगाच्या मागे जितकं धावाल, तितकं ते मृगजळासम तुम्हाला हुलकावण्या देणार. मग ती माणसं असो, वस्तू असो वा इतर काही...


स्थैर्यत्व प्राप्त केल्यावर, आपल्या हातात असणारी जीवनोपयोगी कर्म करत राहा. कशाच्याही मागे धावू नका. ना कसली चिंता, ना कसला गोंधळ, ना द्विधा मनस्थिती. विचारांचा प्रवाह तर मनात वाहला पाहिजे पण गुंता नाही झाला पाहिजे. जसं नितळ पाणी वाहतं, ज्यात तळ ही दिसतो आणि स्वतःचे प्रतिबिंबही.

ना कसलं आकर्षण, ना कोणती ओढ, ना अधीरता, ना कसलं भय...

प्रसंगानुरूप अधेमधे राग डोकावून जावा पण त्या पलीकडे चेहऱ्यावरचं हास्य नाही ढळलं पाहिजे.


"माझ्यामागे काय उरेल" ह्याची खंत नसावी, अन "आज हाती काय लागलं" ह्याचा जास्त विचार ही नसावा. 

मानवीय विचारप्रणालीनुसार, जे जे म्हणून भौतिक सुखात सामावलं जाईल, ते ते मिळवायचं असलं तरी, "मिळावंच" असा आग्रह देखील नसावा. कधीही नं अनुभवलेल्या स्थिरतेच्या जाणिवांनी जीवन व्यापून टाकलं पाहिजे.


भूतकाळात घडलेल्या, वर्तमानकाळात घडणाऱ्या किंवा भविष्यकाळात घडू पाहणाऱ्या अन जीवन बदलणाऱ्या अनेक प्रसंगांचा कोणताही प्रभाव न पडावा. 


विलक्षण गतीने प्रवाहित असणाऱ्या प्रवाहाच्या मधोमध असणाऱ्या भक्कम कातळासम(पाषाणासम)... फक्त पाहायचं...आयुष्याच्या "ऎलतीराला" अन "पैलतीराला.. ! 



- दर्शन जनार्दन पवार ( Darshan Pawar JB ) 

एकदा विचार करा!!

  स्थिर होणं किती महत्वाचं आहे...??? आपलं आयुष्य खूप अस्थिर गोष्टींनी व्यापलेललं असतं, पण जो पर्यंत तुम्ही स्थिर जीवनाच्या तत्वांचा अंगीकार ...